#आई😘
शून्यात असलेली नजर अचानक भानावर येते. स्वप्ऩांतून जागं केल्याबद्दल आईला जरा जास्तंच बोलले आज. पण तरिही काही न बोलता टेबलावर नाश्ता अगदी वेळेत हजर. माझं सारं काही मायेनं, आपुलकीने केलं. अर्थात ती माया, वात्सल्य कळायचं वयंच न्हवतं माझं. डोक्यावरुन हात फिरवत ती बोलली खरी.."सॉरी हं बाळा.. पण नुसती स्वप्ऩं पाहून तुला आनंद मिळत असेल तर त्या स्वप्ऩांना कसलाही अर्थ नाही. त्यासाठी लागणारे कष्ट तुलाच तर घ्यावे लावतील ना..!"
एरव्ही मला तिचा सतत राग यायचा पण आज मात्र तिचे शब्दं कानात घुमू लागले. सतंतचं घड्याळ्याच्या काट्यानुसार वागणं. नियमबद्ध जगणं या साऱ्याच्या कचाट्यातून बाहेर पडायला होतं हल्ली. पण तिनं मात्र सतत कसं सहन केलंय आजवर तिलाच माहीती. तिलाही वाटतं नसेल का..? की तिच्याही इच्छा मनातंच राहिल्यात का..? असे असंख्य विचार यायचे मनात. पण बाबा नसताना पुरेसं शिक्षण नसूनही जी जबाबदारी उचलली ती खरंतर भल्याभल्यांना जमलीच नसती कधी. शिवाय या जगात एकट्या बाईने राहाणं म्हणजे अनेक संकटांना आमंत्रण. पण तरिही न डगमगता मला इथंवर आणून पोहोचवलं. त्याबद्दल कधीही कुरकुर केलेली आठवतं नाही कधी. आज त्या साऱ्याचं भरभरुन कौतुक करण्याचं अप्रूप वाटतंय. निष्ठेने काम करुन मोठ्या कष्टानं मला मोठं केलं आणि मार्गी लावलं व माझ्या स्वतःच्या पायावर उभा केलं. हे सगळं आठवलं की आज मात्र डोळ्यातून झरलेली आसवं तिच्या हातावर पडत होती. आणि माझ्या भावना न दिसताही तिच्या मनापर्यंत पोहोचंत होत्या .एक मात्र खात्री द्यावीशी वाटते तिला.. 'तुझ्या डोळ्यांमधल्या प्रत्येक अश्रुंचा थेंब हा मोत्यात बनवून दाखवेन हे नक्की.'
0 टिप्पण्या